“गाडी बदलत, वारंवार थांबत रुपाली चाकणकर नाशिककडे रवाना!” अशोक खरात प्रकरणात आज एसआयटीसमोर होणार चौकशी


नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात आज मोठी घडामोड घडणार असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या विशेष तपास पथकासमोर हजर राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत असताना आता रुपाली चाकणकर यांच्या चौकशीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या. विशेष म्हणजे, चौकशीसाठी जाताना त्यांनी वाटेत गाडी बदलल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रवासादरम्यान तीन ते चार वेळा गाडी थांबवण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास त्या नाशिकमधील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचून चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या चौकशीदरम्यान विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौकशीवेळी रुपाली चाकणकर यांच्यासोबत महिला वकीलही उपस्थित राहणार आहेत.

अशोक खरातने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सलग दोन वेळा सदस्य म्हणून रुपाली चाकणकर कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याशिवाय अशोक खरातचे जाहीर कौतुक करतानाचे आणि त्याचे पाय धुतानाचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाने मोठे राजकीय व सामाजिक वादंग निर्माण केले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता.

दरम्यान, अशोक खरातविरोधात महिला अत्याचाराचे आठ आणि फसवणुकीचा एक असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयाने २२ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष तपास पथकाकडून पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत गोळा करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे हे दोषारोपपत्र तयार केले जात असल्याची माहिती आहे.

याचदरम्यान, फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. गेल्या चाळीस दिवसांपासून ती फरार असून, अशोक खरातदेखील तिच्याबाबत पोलिसांना स्पष्ट माहिती देत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढत चालले असून, आजची रुपाली चाकणकर यांची चौकशी अनेक महत्त्वाचे खुलासे करू शकते, अशी चर्चा रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!