जावयासाठी लपवलेली सोन्याची अंगठी मांजरीनेच गिळली! चार दिवसांची धावपळ, अखेर शस्त्रक्रियेनंतर अंगठी बाहेर; बीडमधील विचित्र प्रकाराची राज्यभर चर्चा

बीड : अधिक मास म्हटला की जावयाच्या मानपानाचे, वाणधोंड्याचे आणि खास भेटवस्तूंचे दिवस. मात्र बीड जिल्ह्यात घडलेल्या एका अनोख्या घटनेने संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे. जावयाला सरप्राईज देण्यासाठी धोंड्यात लपवून ठेवलेली सोन्याची अंगठी थेट घरातील मांजरीनेच गिळल्याने एका कुटुंबाची अक्षरशः धावपळ उडाली. विशेष म्हणजे अंगठी परत मिळवण्याच्या प्रयत्नात मांजरीचा मृत्यू झाला आणि अखेर तिच्या पोटावर शस्त्रक्रिया करून अंगठी बाहेर काढावी लागली.

माजलगाव तालुक्यातील एका वस्तीवर ४ जून रोजी हा प्रकार घडला. अधिक मासानिमित्त जावयासाठी खास वाणधोंड्याची तयारी सुरू होती. जावयाला आनंदाचा धक्का देण्यासाठी कुटुंबाने सोन्याची अंगठी एका धोंड्यात ठेवून ती इतर धोंड्यांसोबत ठेवली होती. मात्र स्वयंपाकानंतर आवराआवरी सुरू असताना घरात फिरणाऱ्या मांजरीने नेमका तोच धोंडा फस्त केला.
अंगठी गायब झाल्याचे लक्षात येताच घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काही वेळाने मांजरीने तो धोंडा खाल्ल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अंगठी परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अंगठी नैसर्गिकरित्या बाहेर पडेल या आशेने मांजरीला तब्बल चार दिवस घरात बांधून ठेवण्यात आले. तिच्यावर लक्ष ठेवले गेले, मात्र अपेक्षित परिणाम झाला नाही.

यानंतर कुटुंबीयांनी मांजरीला पशुवैद्यकाकडे नेले. अंगठी बाहेर पडावी म्हणून तिला उलटीचे औषध देण्यात आले. मात्र उलटी होण्याऐवजी तिची प्रकृती बिघडली आणि दुर्दैवाने मांजरीचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. अखेर मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यातून सोन्याची अंगठी बाहेर काढण्यात यश आले.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जावयासाठी आणलेली मौल्यवान भेट, ती गिळणारी मांजर, अंगठीसाठी चार दिवस चाललेली प्रतीक्षा आणि शेवटी शस्त्रक्रियेद्वारे ती बाहेर काढण्याची वेळ… या घटनाक्रमाने अनेकांना चक्रावून टाकले आहे.
दरम्यान, वाणधोंड्याच्या दिवशी अंगठी उपलब्ध नसल्यामुळे जावयाला केवळ कपड्यांवर समाधान मानावे लागल्याची चर्चा गावात रंगली होती. नंतर अंगठी मिळाल्यानंतर ती जावयाला देण्यात आली की नाही, याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अधिक मासातील जावयाच्या मानपानासाठी ठेवलेली सोन्याची अंगठी आणि तिच्याभोवती घडलेला हा अनपेक्षित घटनाक्रम सध्या बीडसह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.