नियमबाह्य पध्दतीने खते व किटकनाशकांची विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल; उरुळीकांचन व शिंदवणे येथे जिल्हा कृषी विभाग व पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची कारवाई…

उरुळी कांचन : मनमानी व कृषी विभागाचे नियम न पाळता खते व कीटकनाशके विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उरुळी कांचन येथील ‘साई शेती भांडार’ आणि मुदत संपलेला परवाना वापरून अनाधिकृत ठिकाणी खते व कीटकनाशकांची विक्री करणारे शिंदवणे येथील ‘कौशल्या शेती भांडार’ या दोन दुकानदारांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेल्या विक्रेत्यांची नावे आहेत.

पहिल्या घटनेत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील (वय- 55 रा. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उरुळी कांचन येथील पुणे-सोलापूर रस्त्यावर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ‘साई शेती भांडार’ या दुकानाची 16 जुलै 2026 रोजी तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी साठा नोंदवही न ठेवणे, परवान्यात उत्पादक कंपनीचा समावेश न असणे आणि इतर गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.


याप्रकरणी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी 22 जुलै रोजी सुनावणी घेऊन ‘साई शेती भांडार’चा बियाणे विक्री परवाना 15 दिवसांसाठी निलंबित केला होता. असे असतानाही रविवारी (दि. 02) सायंकाळी 6 वाजता भरारी पथकाचे धनंजय पाटील, कृषी अधिकारी अशोक वेताळ आणि मोहीम अधिकारी विनय कदम यांनी अचानक दुकानाची पाहणी केली. त्यावेळी दुकान सुरू असल्याचे आणि 28 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत पालक, मका, काकडी व शेपूच्या बियाणांची बेकायदेशीर विक्री केल्याचे बिल पुस्तकावरून उघडकीस आले.
शासकीय आदेशाचा भंग करून विनापरवाना बियाणे विक्री केल्याप्रकरणी दुकानाचे मालक बाळासाहेब उल्हास साळुंखे (वय -45, रा. गुळवंची, ता. जत, जि. सांगली) यांच्याविरोधात बियाणे नियंत्रण आदेश 1983आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 (2)(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत पुणे जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी विनय दिलीपराव कदम (वय-46, रा. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिंदवणे (ता. हवेली) येथील ‘कौशल्या शेती भांडार’ या दुकानाची 2 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता भरारी पथकाने तपासणी केली.
तपासणीदरम्यान दुकान चालक पोपट तुकाराम महाडीक (वय -50, रा. शिंदवणे, ता. हवेली) यांच्या बियाणे व खते विक्री परवान्याची मुदत 23 नोव्हेंबर 2025 रोजीच संपल्याचे निष्पन्न झाले. तरीही कोणतीही नूतनीकरण प्रक्रिया न करता ते विनापरवाना खते व बियाण्यांची विक्री करत होते.
तसेच, कीटकनाशक विक्रीचा परवाना उरुळी कांचन-जेजुरी रोड (कॅनाल शेजारी) या जागेचा असताना, त्यांनी परस्पर ‘वळती फाटा’ (मिळकत नं. 286 ब) या अनधिकृत ठिकाणी साठवणूक व विक्री सुरू ठेवली होती. याप्रकरणी विविध कलमान्वये दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखणे, निकृष्ट व बनावट बियाण्यांचा पुरवठा थांबवणे आणि कृषी क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सदर दोन्ही प्रकरणांत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.