भाडेपट्ट्यावर ताब्यात असलेली जमीन परस्पर विकून विश्वासघात केल्याप्रकरणी माजी सरपंचांसह ७ जणांवर गुन्हा दाखल.


लोणी काळभोर, ता. २२ : भाडेपट्ट्यावर ताब्यात असलेली जमीन परस्पर विकून विश्वासघात केल्याप्रकरणी लोणी काळभोरचे माजी सरपंच यांचेसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अलका श्रीहरी जागडे (रा. कोथरूड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोरचे माजी सरपंच योगेश प्रल्हाद काळभोर, त्यांचा मुलगा कार्तिक योगेश काळभोर, मोठा भाऊ आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास प्रल्हाद काळभोर, पुतण्या आग्नेय शिवदास काळभोर, आदित्य उमेश काळभोर, त्र्यंबक राऊजी शेळके व ताराबाई आबू जागडे यांचेवर अशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील गट क्रमांक ११६ मधील ८१ गुंठे जमीन ही मूळ मालक त्र्यंबक राऊजी शेळके आणि ताराबाई आबू जागडे यांच्या मालकीची होती. पानशेत धरणाच्या पुनर्वसनातून मिळालेली ही जमीन कै. श्रीहरी तानाजी जागडे यांनी ३ ऑक्टोबर २००३ रोजी १११ वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर घेतली होती. यासोबतच संबंधित जमिनीबाबत कधीही रद्द न होणारे कुलमुख्त्यारपत्रही करण्यात आले होते. गेल्या २३ वर्षांपासून जागडे कुटुंब या जमिनीवर शेती करत असून, ऊस पिकाची लागवड करून त्याचे बिल व कागदपत्रेही त्यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

२१ मे २०२६ रोजी सकाळी ते शेतात गेले तेंव्हा फिर्यादींना त्यांच्या जमिनीवर लावलेल्या लोखंडी फलकावर आदित्य उमेश काळभोर, कार्तिक योगेश काळभोर आणि आग्नेय शिवदास काळभोर यांच्या मालकी व ताब्याचा दावा करण्यात आला होता. हा प्रकार लक्षात येताच अलका जागडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेल्या. पोलिसांनी दोन्ही पक्षांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला होता. परंतु, २२ मे रोजी अलका जागडे शेतात गेल्यानंतर शेतातील उभे असलेले ऊस पीक ट्रॅक्टरने नांगरून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मूळ मालकांना भाडेपट्टा आणि कुलमुख्त्यारपत्राची पूर्ण माहिती असतानाही, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी तृतीय पक्षाला जमीन विकल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. त्यामुळे हा प्रकार विश्वासघात आणि आर्थिक फसवणुकीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वरील सात जणांच्या विरोधात फसवणूक, विश्वासघात, बेकायदेशीर प्रवेश आणि पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!