लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ई-केवायसी आणि पात्रता तपासणीनंतर सध्या १ कोटी ६५ लाख महिला पात्र ठरल्या असून, त्यांना योजनेचा लाभ मिळत राहणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी ९२ लाख महिला अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. योजनेसाठी काही नियम आणि निकष निश्चित करण्यात आले होते. या निकषांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये ई-केवायसी महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, वारंवार संधी देऊनही ज्या लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण केले नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ई-केवायसी पूर्ण करून पात्र ठरलेल्या १ कोटी ६५ लाख महिलांना कोणताही खंड न पडता पैसे मिळत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


काही लाभार्थी कुटुंबे आयकराच्या कक्षेत येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्या पुरुष लाभार्थ्यांवर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेतलेल्या संबंधित महिलांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील सध्याचा आकडा पूर्णपणे पडताळणी झालेला असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. आपले सरकार सत्तेत असेपर्यंत पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘वंदे मातरम्’वरूनही फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसकडून ‘वंदे मातरम्’च्या काही कडव्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरही फडणवीस यांनी टीका केली. स्वतंत्र भारताच्या संसदेनं घेतलेल्या निर्णयाचा विरोध करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. आम्ही मानणार नाही, अशी भूमिका घेणे ही मानसिक गुलामगिरीची लक्षणे आहेत, अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधी पुण्यात तरुणांशी संवाद साधणार असल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांद्वारे संचालित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.