खळबळजनक! मुलाच्या हव्यासातून जुळ्या मुलींना टाकले मारून, धक्कादायक घटनेने पुणे हादरलं..
पुणे : मुलाच्या हव्यासापोटी दोन जुळ्या बहिणींचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना हडपसर परिसरात सन २०१९-२० या कालावधीत घडली आहे.
न्यायालयाने याप्रकरणी वडिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हडपसर पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार वडिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिद्धी व सिद्धी अतुल सूर्यवंशी अशी खून झालेल्या जुळ्या बहिणींची नावे आहेत. तर त्यांचे वडील अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, आजोबा बाबासाहेब, आजी जयश्री, काका अमोल बाबासाहेब सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय ३५, रा. साई संस्कृती सोसायटी, बायफ रस्ता, वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची बहिण उर्मिला अतूल सूर्यवंशी यांना मुलगा च हवा या कारणामुळे त्यांना मानसिक त्रास देऊन मुले गोरे होण्याकरीता त्यांना वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या.
त्यानंतरही त्यांना जुळ्या मुली झाल्या. बाळंतपणानंतर सहा महिन्यांनी त्या दोन्ही मुलींसह सासरी आल्या. उर्मिला हिने २६ नोव्हेबर २०१९ रोजी मुलींना दुध पाजून झोपवले असतानाही त्यांच्या पतीने त्या मुली झोपेत असताना सिद्धी हिला बाहेरील दुध पाजले.
त्यामुळे तिचा मृत्यु झाला. अशाच प्रकारे ६ फेबुवारी २०२० रोजी दुसरी मुलगी रिद्धी हि झोपली होती. अतुल सूर्यवंशी याने झोपलेले मुलीला बाहेरील दुध पाजून तिला जीवे ठार मारले.
मुली झोपेत असल्याने पाजलेले दुध श्वास नलिकेत गेल्याने त्यांचा श्वास गुदमरुन मृत्यु झाला. अमोल सूर्यवंशी हा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्याला एखाद्याचा मृत्यु झाल्यानंतरही त्याचे खरे कारण शवविच्छेदनात कसे येणार नाही, याची माहिती असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.
याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शिवले तपास करत आहेत.