राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण! गांधी कुटुंब अन् अमित शाह एकाच फ्रेममध्ये; सुप्रिया सुळेंच्या लेकीचं रिसेप्शन चर्चेत


नवी दिल्ली : संसदेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. मात्र, राजकीय मतभेद बाजूला ठेवत अनेक दिग्गज नेते एकाच कार्यक्रमात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह गांधी कुटुंब आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली.

राजधानी दिल्लीत सोमवारी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची कार्यक्रमादरम्यान भेट झाली. दोघेही एकमेकांशी चर्चा करताना दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

या रिसेप्शनला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहकुटुंब हजेरी लावली. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह गांधी कुटुंबीयांनी नवविवाहित रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही रिसेप्शनला उपस्थित राहत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देऊन रेवती आणि सारंग यांचे अभिनंदन केले. यावेळी नवविवाहित जोडप्यासोबत त्यांनी फोटोही काढला.

रेवती सुळे यांचा काही दिवसांपूर्वी सारंग लखानी यांच्याशी विवाह झाला. या विवाहसोहळ्याला आणि रिसेप्शनला राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले.

दरम्यान, याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या आठ खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदनही मोदी यांच्याकडे सादर केले.

सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या रिसेप्शनला सत्ताधारी आणि विरोधकांमधील अनेक दिग्गज नेते एकत्र आल्याने या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!