पुण्यातील बस प्रवास महागणार, दहा वर्षांनंतर पीएमपीएमएलच्या बसभाड्यात मोठी वाढ, नवीन दर काय?

पुणे : पुणेकरांना शहर वाहतूक सेवेच्या बसमधून प्रवास करताना आता जादा पैसे मोजावे लागणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेचा दरात येत्या १ जून पासून वाढ होत आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर पीएमपीएमएलने बसभाड्यात मोठी वाढ जाहीर केली असून, ही दरवाढ येत्या १ जून २०२५ पासून अंमलात येणार आहे. या दरवाढीचा परिणाम पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील लाखो प्रवाशांवर होणार आहे.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळ आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांची यास मान्यता मिळाल्यानंतर नव्या दरांची अंमलबजावणी पहाटेपासून सुरू होणार आहे. दरवाढीबरोबरच दैनंदिन आणि मासिक पासचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या ३१ मार्च २०१८ च्या राजपत्रानुसार स्टेज रचनेत सुधारणा करून नवीन ११ टप्प्यांवर आधारित दर प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रवासाचे अंतर आणि त्यावर आधारित दर पुढीलप्रमाणे असतील..
असे असणार नवीन दर
प्रवासाचे एकूण ११ टप्पे…
एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी दर पाच किलोमीटर अंतराने सहा टप्पे
३० ते ८० किलोमीटरसाठी दहा किलोमीटर अंतराने पाच टप्पे
५ किमीपर्यंतसाठी १० रुपये
५.१ ते १० किमी २० रुपये
१०.१ ते १५ किमी ३० रुपये
१५.१ ते २० किमी ४० रुपये
फक्त तिकीट दरच नव्हे तर, दैनंदिन व मासिक पासचे दर देखील वाढवण्यात आले आहेत:
दैनंदिन पास (पुणे व पिंपरी-चिंचवड) – ₹७० (पूर्वी ₹४०)
दैनंदिन पास (PMRDA हद्दीत)- ₹१५० (पूर्वी ₹१२०)
मासिक पास – ₹१५०० (पूर्वी ₹९००)
दरम्यान, यामध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलती कायम ठेवण्यात आल्या आहेत, यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.