‘ऑपरेशन टायगर 3.0’चा बिगुल! 6 खासदारांनंतर ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का? संजय शिरसाटांच्या विधानाने राजकीय खळबळ


मुंबई : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर माजी मंत्री सचिन अहिर यांनीही ठाकरे गटाची साथ सोडल्याने पक्षातील गळतीचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच मंत्री संजय शिरसाट यांनी “ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाले असून आता मोठा राजकीय भूकंप होणार आहे. तो कधी होईल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील,” असे वक्तव्य करत नव्या चर्चांना तोंड फोडले.

शिरसाट यांच्या या विधानामुळे ठाकरे गटातील आणखी काही नेते किंवा पदाधिकारी शिंदे गटात जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. यापूर्वीही शिरसाट यांनी ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख केला होता आणि त्यानंतर ठाकरे गटातील खासदारांनी पक्षांतर केले होते. त्यामुळे त्यांच्या नव्या वक्तव्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणावरून ठाकरे गटाने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. यावर टीका करत शिरसाट म्हणाले, “या आंदोलनाला जनतेचा प्रतिसाद मिळणार नाही. धार्मिक मुद्द्यांवर सातत्याने बदलणारी भूमिका लोकांना मान्य नाही. पूर्वी हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांवर कारवाई करणारे आता रामरक्षा पठणाची भाषा करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, आगामी काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!