पत्नीकडे 10 लाखांची मागणी; बेल्ट आणि क्रिकेट बॅटने अमानुष मारहाण, पतीविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा

लोणी काळभोर : लग्नानंतर पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव टाकत माहेराहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी, सातत्याने शारीरिक व मानसिक छळ, तसेच बेल्ट आणि क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रशांत बन्सीलाल महाजन (रा. सोनगीर, जि. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय फिर्यादी महिलेचा विवाह ३ डिसेंबर २०१७ रोजी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत सुरू असताना त्यानंतर पतीने नोकरी करून पगार घरी आणण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केली. “मी तुला एकटा सांभाळू शकत नाही,” असे सांगत वारंवार माहेराहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादी तीन महिन्यांच्या गरोदर असतानाही त्यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. मुलीच्या जन्मानंतरही छळ सुरूच राहिला. किरकोळ कारणांवरून वाद घालणे, आई-वडिलांचा अपमान करणे आणि पुन्हा संसार करायचा असेल तर सासूसमोर माफी मागण्याची अट घालण्यात आली. पतीची बदली बडोदा येथे झाल्यानंतरही आर्थिक कारणांवरून मानसिक व शारीरिक छळ सुरूच राहिला. सन २०२१ मध्ये पुण्यात आल्यानंतरही नोकरी करण्यासाठी दबाव टाकत दहा लाख रुपयांची मागणी करून घराबाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, आर्थिक अडचणीचे कारण सांगून पतीने फिर्यादीचे साडेसहा तोळे आणि मुलीचे दोन तोळे सोन्याचे दागिने घेतले. तसेच तिच्या नावावर दहा लाखांचे कर्ज काढून त्याचा वापर स्वतःसाठी केला आणि कर्जफेडीची जबाबदारी तिच्यावरच टाकल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच काळात बेल्ट व क्रिकेटच्या बॅटने वारंवार मारहाण करण्यात आली. अनेकदा मध्यरात्री घराबाहेर काढून रात्रभर बाहेर बसण्यास भाग पाडले.
अखेर २ ऑगस्ट २०२५ रोजी पतीने कायमचे माहेरी पाठवून दिल्यानंतर पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.