पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्यासह 8 जणांकडून बेदम मारहाण; उरुळी कांचन येथील घटना..


उरुळी कांचन : आपल्या पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या दाजीला मेव्हण्याने आणि त्याच्या 6 ते 7 साथीदारांनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एम.जी. रोड परिसरात मंगळवारी (ता. 05) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

कुणाल वाल्मिक डोळसे (वय 23, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. तांबे वस्ती, बायफ रोड, उरुळी कांचन) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शुभम विठ्ठल शेळके (मेव्हुणा), संकेत (पूर्ण नाव माहिती नाही) व इतर सहाजण (त्यांचेहि नाव व पत्ता माहिती नाही) असे मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल डोळसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील आठ जणांवर शुक्रवारी (ता. 09) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल डोळसे हे मंगळवारी (ता. 05) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीला घरी आणण्यासाठी एम.जी. रोड येथील सासरी गेले होते. यावेळी त्यांचा मेव्हणा शुभम शेळके याने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कुणाल यांनीही प्रत्युत्तरात शिवीगाळ केल्याने वाद विकोपाला गेला.

रागाच्या भरात शुभम शेळके याने आपले 5 ते 6 मित्र बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी शुभम शेळके, संकेत आणि इतर 6 अनोळखी साथीदारांनी कुणाल डोळसे यांना घेरले. या सर्वांनी मिळून कुणाल यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात कुणाल यांच्या नाकावर, तोंडावर, गालावर, हातावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे.

मारहाणीनंतर जखमी कुणाल यांनी उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेतले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी शुभम शेळके, संकेत आणि इतर सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(१), १९१(२), १९०, ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार खरात या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!