पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; RSS मुख्यालय, विधान भवनही लक्ष्यावर? ई-मेलमुळे प्रशासनात खळबळ

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने बुधवारी सकाळी प्रशासन, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर आलेल्या या धमकीच्या संदेशात पुणे महापौर कार्यालयासह नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालय आणि विधान भवन यांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी सुमारे ८.२० वाजण्याच्या सुमारास हा ई-मेल प्राप्त झाला. मेल मिळताच महापालिका प्रशासनाने तातडीने पुणे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर सेल, गुन्हे शाखा आणि इतर सुरक्षा यंत्रणा काही मिनिटांतच महापालिका मुख्यालयात दाखल झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण परिसर सुरक्षा कवचात घेण्यात आला.
धमकीच्या ई-मेलमध्ये आयईडी (IED) बॉम्बचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट तारखा आणि वेळांचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे ही धमकी केवळ खोडसाळपणा आहे की त्यामागे काही गंभीर कट आहे, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा किंवा संघटनेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला असून आयपी अॅड्रेस आणि ई-मेलचा डिजिटल ट्रेल तपासला जात आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार मुख्य इमारतीतील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले असून, शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले. बॉम्ब शोधक पथकाने इमारतीतील प्रत्येक मजला, कार्यालये, पार्किंग परिसर आणि सार्वजनिक जागांची कसून तपासणी केली.

प्राथमिक माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल कथित “खलिस्तान नॅशनल आर्मी” या नावाने पाठवण्यात आला असल्याचे समोर आले आहे. मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख करण्यात आला असून, त्या कारवाईचा बदला घेण्यासाठी स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित संस्थांनी ऑपरेशन ब्लू स्टारला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ही धमकी देण्यात आल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
धमकीच्या ई-मेलमध्ये पुण्यातील महापौर कार्यालय, नागपूरमधील RSS मुख्यालय आणि विधान भवनाचा स्पष्ट उल्लेख असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. नागपूर पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून संबंधित ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक साहित्य आढळून आले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. तरीही पोलिस कोणताही धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत नसून प्रत्येक बाबीची बारकाईने चौकशी करत आहेत. सायबर विभाग ई-मेलचा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत असून हा मेल देशांतर्गत पाठवण्यात आला की परदेशातून, याचाही तपास सुरू आहे.
या घटनेमुळे महापालिका प्रशासन, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धमकीमागील नेमका उद्देश, त्यातील तथ्य आणि संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.