ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून आरोपी गजाआड, घटनेने उडाली खळबळ…

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. यामुळे देशासह राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आली आहे. असे असताना पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. ससून हॉस्पिटलमध्ये काम करत असणाऱ्या एका डॉक्टरच्या मोबाईलवर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मेसेजद्वारे आले.
यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या धमकीची दखल घेत ससून रुग्णालयाचा संपूर्ण परिसर चेक केला. ससून रुग्णालयाचा एकही कोपरा पोलिसांनी सोडला नाही. पण कुठेच काही आढळलं नाही. त्यामुळे कुणीतरी मुद्दाम हे कृत्य केल्याचे दिसून आले.
या धमकीला गंभीरतेने घेत पोलिसांनी धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पुण्याच्या पोलिसांनी तपास केला. रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानेच ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी थेट त्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपी अरविंद कृष्णा कोकणी याला अटक केली. त्याला येरवडा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. आरोपी सुरुवातीला आपला गुन्हा कबूल करत नव्हता. पण नंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. यावेळी त्याने नेमका कोणाच्या मोबाईलमधून धमकी दिली ती देखील माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने धमकी देण्यासाठी ससून रुग्णालयातील एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरला होता. त्यातून त्याने ही धमकी दिली.
दुसऱ्या दिवशी त्याने मोबाईल सुरु केला आणि थेट रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचा मेसेज केला. त्यानंतर त्याने परत मोबाईल बंद केला. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. याबाबत त्याने हे कृत्य का केलं? याबाबत अजून माहिती समोर आली नसली तरी याबाबत तपास सुरु आहे.