मोठी बातमी! पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ भंगाराच्या दुकानात आढळले बॉम्ब शेल, घटनेने सगळेच हादरले, बॉम्ब नाशक पथक दाखल…

पुणे : भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणात पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील एका भंगार दुकानात दोन जुने बॉम्ब शेल आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.
याबाबत पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील एका भंगाराच्या दुकानात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही बॉम्ब शेल आढळली. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच, पिंपरी पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पथकाने कसून तपासणी करून दोन्ही बॉम्ब शेल ताब्यात घेतले. हे बॉम्ब शेल जुने असून, त्यांची तीव्रता कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही, खबरदारी म्हणून ते संरक्षण दलाच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी भंगार दुकानाच्या मालकाची चौकशी सुरू केली असून, बॉम्ब शेल कुठून आले याचा तपास सुरू आहे.
सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत अशा घटना नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याने, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलिसांकंडून केला जातं आहे.