एकाच खोलीत आढळले पती-पत्नीचे मृतदेह; तपासात समोर आलं थरकाप उडवणारं सत्य, पुण्यात खळबळ


पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीमधील शेलूगाव परिसरातून नातेसंबंधांना हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीमध्ये आपापसातील कुरघोडीवरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मृत्यूमध्ये झालं.

किरकोळ वादाचा राग अनावर झाल्याने आधी पतीने पत्नीचे डोके जमिनीवर अमानुषपणे आपटून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतःही घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या भयानक प्रकारामुळे संपूर्ण चाकण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, शेलूगाव येथील ठाकरवस्तीत राहणारे नवनाथ खेमा केदारी आणि त्यांची पत्नी पिनाई केदारी (वय ३०) यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत वाद धुमसत होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये आपापसातील वर्चस्वावरून आणि कुरघोडीवरून जोरदार वादावादी झाली.

हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात पतीने पिनाई यांना खाली पाडले आणि त्यांचे डोके वारंवार जमिनीवर अत्यंत जोराने आपटले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

आपल्याच हाताने पत्नीचा खून झाल्याचे समोर दिसताच पतीच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसी कारवाई आणि पश्चात्तापाच्या भीतीने त्याने कोणताही विचार न करता घरातच गळफास लावून आपलीही जीवनयात्रा संपवली. एकाच बंद खोलीत पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आणि शेजारीच पतीचा लटकणारा मृतदेह पाहून सगळ्यांचाच थरकाप उडाला.

या धक्कादायक दुहेरी मृत्यूच्या प्रकरणी दादाभाऊ बिराजी कढाळे (वय ५५ वर्षे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

किरकोळ घरगुती वादातून पती पत्नीचा जीव गेल्याच्या या थरारक घटनेमुळे औद्योगिक पट्ट्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!