भाजपचा ‘एक डाव’ अन् शिंदेसेनेला मोठा धक्का! कसब्यात पदाधिकारी फुटणार; धंगेकरांचा थेट पलटवार

पुणे : पुण्याच्या कसबा मतदारसंघात महायुतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटातील काही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. वैष्णवी किराड यांच्यासह शिंदे गटातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, कसब्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गटानेही चांगली कामगिरी केली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही मित्रपक्षांमध्ये अनेक ठिकाणी राजकीय चुरस पाहायला मिळाली. काही ठिकाणी युती झाली, तर काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.

ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये युती झाली नाही, तिथे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. शिंदे गटातील काही संभाव्य उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपची वाट धरली. या पक्षांतरांमुळे शिंदे गटाला स्थानिक पातळीवर फटका बसल्याची चर्चा झाली होती. यावर शिंदे गटाकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती.


आता पुण्यातील कसब्यात पुन्हा एकदा अशीच राजकीय घडामोड घडली आहे. वैष्णवी किराड यांच्यासह शिंदे गटातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने कसबा परिसरातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ही घडामोड रवींद्र धंगेकर यांच्यासाठीही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
या पक्षप्रवेशाबाबत रवींद्र धंगेकर यांनी मात्र आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणी आले न आले तरी धंगेकर एकटा बास आहे. एकटा धंगेकर सगळ्यांना बास आहे, मला काय कोणाची मदत लागत नाही,’ असं धंगेकर यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये जाणार असले तरी आपण कोणावर अवलंबून नसल्याचा संदेश त्यांनी दिल्याचं मानलं जात आहे.
कार्यकर्त्यांबाबत बोलताना धंगेकर म्हणाले की, ‘मी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या जागी ठेवतो, त्यांचं भविष्य आहे, त्यांना काम करायचं आहे.’ आपल्या राजकीय वाटचालीत आपण कोणाला सोबत घेऊन चालत नसल्याचं सांगत त्यांनी पुन्हा ‘इथे एकटा धंगेकर बास आहे,’ असं म्हटलं.
कसब्यातील या घडामोडीमुळे भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे. शिंदे गटातील आणखी किती पदाधिकारी भाजपमध्ये जाणार, या पक्षप्रवेशानंतर शिंदे गटाची पुढील रणनीती काय असेल आणि कसब्यातील आगामी राजकीय समीकरणांवर याचा किती परिणाम होईल, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.