स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा निर्णय, पक्षाला मिळणार नवीन प्रदेशाध्यक्ष, नावही ठरलं…

मुंबई : राज्य भाजपला अखेर नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत. याबाबत माहिती पुढे आली असून सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू केली आहे.
याबाबत वरळी डोम येथे एक जुलैला अधिकृत घोषणा होणार आहे. यावेळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा केली जात होती. या पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे दिसून आले होते.
भाजपने महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील संघटनात्मक निवडणुकांवर देखरेख करण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री आणि एक माजी केंद्रीय आणि विद्यमान खासदार यांची राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देखील बदल लवकरच केला जाणार आहे.
या निवडणुका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीची पूर्वसूचना आहेत. दरम्यान, गुजरात, उत्तराखंड, तेलंगणा, त्रिपुरा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर, पक्ष 15 जुलैपर्यंत आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
यामुळे याबाबत देखील आता हालचाल सुरू करण्यात आली आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व लवकर संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार करत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.