भाजप आमदार सुरेश धसांची आमदारकी धोक्यात? न्यायालयात याचिका दाखल, धक्कादायक माहिती आली समोर….

बीड : भाजप आमदार सुरेश धस सध्या अडचणीत आले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने त्यांना नोटीस बजावली आहे. यामुळे इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे भाजप आमदार सुरेश धस स्वतःच कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी त्यांच्या विजयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले
आहे.
यामुळे न्यायालयाने सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे धस यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. आष्टी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या सुरेश धस यांनी १,४०,५०७ मते मिळवत विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांना ६२,५३२ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख यांना ५२,७३८ मते मिळाली होती.
धस यांनी तब्बल ७७,९७५ मतांनी विजय मिळवला होता. मात्र, निवडणुकीदरम्यान धार्मिक कारणांवरून मतं मागणे, मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करणे आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणे अशा गंभीर आरोपांसह मेहबूब शेख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशिनच्या सीलवर स्वाक्षरी न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर औरंगाबाद खंडपीठाने सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावत खुलासा मागवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मार्चला होणार आहे.
आता न्यायालयाचा निर्णय काय असेल हे येणाऱ्या काळात समजणार आहे. असे असले तरी भल्याभल्यांना अडचणीत आणणारे आमदार सुरेश धस अडचणीत आल्याने याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सध्या धस हे अनेक कारणाने चर्चेत आले आहेत.