20 दिवसांत 6 वेळा सापाने घेतला चावा! मावशीच्या घरापासून बाथरुमपर्यंत नागाचा पाठलाग? 21 वर्षीय तरुणाच्या प्रकरणाने कुटुंबीयांसह डॉक्टरही अवाक्

इटावा : साप दिसला तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो; मात्र उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील एका 21 वर्षीय तरुणाच्या बाबतीत जे घडले, त्याने त्याचे कुटुंबीयच नव्हे तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही हैराण केले आहे. अवघ्या 20 दिवसांच्या कालावधीत अंकुश यादव याला तब्बल सहा वेळा सर्पदंश झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे, रविवारी मावशीच्या घरी सापाने चावा घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घरातील वॉशरूममध्ये पुन्हा त्याला सर्पदंश झाला.
हे प्रकरण जसवंतनगरमधील नगला भगत गावातील आहे. अर्जेश यादव यांचा 21 वर्षीय मुलगा अंकुश यादव सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता घरातील वॉशरूममध्ये गेला होता. त्याचवेळी वॉशरूममध्ये असलेल्या सापाने त्याला दंश केला. साप चावल्याचे समजताच कुटुंबीयांनी कोणताही वेळ न दवडता अंकुशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून तातडीने उपचार सुरू केले.

प्रत्येक वेळी रुग्णालयात दाखल


नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 20 दिवसांत अंकुशला सहा वेगवेगळ्या प्रसंगी सापाने दंश केला आहे. प्रत्येक वेळी कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मागील दोन घटनांमध्ये त्याची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयातही पाठवले होते. वेळेत उपचार मिळाल्याने प्रत्येक वेळी त्याचा जीव वाचला.
मावशीच्या घरातही सर्पदंश
या घटनांमधील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे अंकुश रविवारी आपल्या मावशीच्या घरी गेला असताना तिथेही त्याला सापाने चावा घेतल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तो नवा टेडा, बरनाहल, करहल परिसरातील मैनपुरी येथे मावशीच्या घरी गेला होता. तिथे सर्पदंश झाल्यानंतर तो आपल्या घरी परतला. मात्र दुसऱ्याच दिवशी सोमवारी संध्याकाळी घरातील बाथरुममध्ये पुन्हा सापाने त्याला दंश केला.
साप अजूनही मोकाटच
अंकुशला वारंवार सर्पदंश होत असल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घर आणि आजूबाजूच्या परिसरात सापाचा वावर असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. वारंवार साप दिसून येत असल्याचा दावा असूनही अद्याप संबंधित सापाला पकडण्यात आलेले नाही. त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिंता आणखी वाढली आहे.
सध्या अंकुशवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात प्रत्येक सर्पदंशानंतर वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याला मोठा धोका टळला. मात्र 20 दिवसांत सहा वेळा सर्पदंश झाल्याच्या दाव्यामुळे या घटनांची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी होणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सर्पदंश झाल्यानंतर झाडफूक किंवा अंधश्रद्धेच्या उपायांवर वेळ न घालवता कुटुंबीयांनी प्रत्येक वेळी अंकुशला रुग्णालयात नेले. त्यामुळे त्याला वेळेत उपचार मिळाले. मात्र एका तरुणाला वारंवार सर्पदंश होण्यामागे नेमके कारण काय, घर आणि परिसरात सापांचा वावर का आहे, याचा शोध घेणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.