मोठी अपडेट! 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा कधी येणार? RBI गव्हर्नरांनी दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटांच्या फील्ड ट्रायलला मंजुरी दिल्यानंतर आता या नोटांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पार पडल्यास पुढील आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्लास्टिक नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट आहे.
एमपीसी बैठकीनंतर बोलताना मल्होत्रा म्हणाले की, अनेक देशांमध्ये गेली 30 वर्षांहून अधिक काळ पॉलिमर नोटांचा यशस्वी वापर होत आहे. विशेषतः 10 आणि 20 रुपयांसारख्या कमी मूल्याच्या नोटा वारंवार वापरल्या जात असल्याने त्या लवकर खराब होतात. त्यामुळे या नोटांसाठी पॉलिमरचा वापर अधिक फायदेशीर ठरेल.

आरबीआयने पॉलिमर साहित्य खरेदीसाठी निविदा मागवल्या असून त्यानंतर विविध सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य वेळी नागरिकांना अधिकृत माहिती दिली जाईल.


पॉलिमर नोटांचे फायदे
आरबीआयनुसार, पॉलिमर नोटा कागदी नोटांपेक्षा तीन ते चार पट अधिक टिकाऊ असतात. त्या सहज फाटत नाहीत, पाण्याचा आणि झिजेचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. यामुळे चलनी नोटांचे आयुष्य वाढेल आणि नवीन नोटा छापण्याचा खर्चही कमी होण्यास मदत होईल.
याशिवाय, देशातील वाढत्या चलनाच्या गरजा लक्षात घेता चलननिर्मितीची क्षमता वाढवण्यासही पॉलिमर नोटा उपयुक्त ठरणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 2 अब्ज प्लास्टिक नोटा छापण्याची तयारी असून, हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर त्यांचा वापर टप्प्याटप्प्याने देशभर वाढवला जाणार आहे.