लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! मार्च-एप्रिलचे ₹3000 एकत्र मिळणार? 66 लाख अर्ज बाद, नवी यादी समोर


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी आणि कडक पडताळणीनंतर सरकारने तब्बल ६६ लाख अर्ज अपात्र ठरवले असून आता राज्यातील १ कोटी ७७ लाख पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असल्याने महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सरकारकडून करण्यात आलेल्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांच्या अर्जांची सखोल छाननी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात अपात्र अर्ज आढळून आले. त्यानंतर ६६ लाख अर्ज कायमस्वरूपी बाद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमुळे राज्याच्या तिजोरीवरील सुमारे १० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असून, पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने ही मोहीम राबवली असल्याचे बोलले जात आहे. ई-केवायसीमुळे डुप्लिकेट आणि नियमबाह्य अर्जांवर आळा घालण्यात प्रशासनाला यश मिळाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पात्र महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. म्हणजेच पात्र लाभार्थी महिलांना एकाचवेळी ३ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. यासाठी शासन स्तरावर तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय स्तरावर निधी वितरणाची तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जात असून, याच आठवड्यात महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, योजनेत आपले नाव कायम आहे की नाही, याबाबत अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या आणि निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेतील या नव्या घडामोडींमुळे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!