भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप! नगरसेविकांवर अट्रॉसिटी गुन्हा दाखल; अंतर्गत वाद पेटला


पुणे : पुण्यात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविकांमधील वाद आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या दुसऱ्या नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ बापू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली असून या घटनेमुळे पुणे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, पुणे महापालिका निवडणुकीपासूनच पाटील आणि कांबळे कुटुंबांमध्ये वाद सुरू होते. प्रचारादरम्यान निवडणूक कार्यालयावरील बॅनर काढणे, कांबळे यांच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणे आणि विजयानंतर त्यांच्या घरासमोर लावलेल्या बॅनरवरून वाद वाढत गेला, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच पाटील दांपत्य जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत नमूद आहे. यामुळे या प्रकरणाला सामाजिक आणि राजकीय रंगही मिळाला आहे.

विशेष म्हणजे याआधीच नगरसेविका अर्चना पाटील यांनी मृणाल कांबळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे हा वाद दोन्ही बाजूंनी वाढत असल्याचे दिसत आहे. पक्षांतर्गत संघर्ष आणि वैयक्तिक वाद आता उघडपणे समोर आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातच भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये वसतिगृहाच्या कामावरून मोठा वाद झाला होता. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यात कामाच्या टक्केवारीवरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. बाणेर भागातील त्या वादानंतर आता हा नवा संघर्ष समोर आल्याने भाजपच्या अंतर्गत मतभेदांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!