मोठी बातमी! अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी ; पोलिसांना धमकीचा मेसेज, 400 किलो RDX अन 34 गाड्या…

मुंबई : लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. सगळीकडे भक्तीमय वातावरण असतानाच आता अनंत चतुर्दशीपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांना एक धमकीचा मेसेज मिळाला आहे.अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचं या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. या संदेशात 34 वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, 400 किलो आरडीएक्समुळे 1 कोटी लोक मृत्युमुखी पडतील असं म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवरची जबाबदारी आणखी वाढली आहे.
उद्या मुंबईत गणेश विसर्जन सोहळा आहे. अनंत चतुर्दशी असल्याने लाखो मुंबईकर उद्या रस्त्यावर उतरतील. मात्र, त्याआधी एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मागचे दहा दिवस मुंबई पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावली. मुंबई पोलिसांमुळेच मुंबईकरांना गणेशोत्सव कुठल्याही विघ्नाशिवाय आनंदात साजरा करता आला. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना धमकीच्या आलेल्या मेसेजने खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
