मोठी बातमी! पुण्यातील रिंग रोड प्रकल्प रखडला; संरक्षण विभागाच्या जमिनीच्या ताब्यामुळे विलंब….

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा महत्वकांक्षी रिंग रोड प्रकल्प पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संरक्षण विभागाची जमीन अद्याप ताब्यात न आल्याने पहिल्या टप्प्यातील सोलू ते वडगाव शिंदे या मार्गासाठी निविदा प्रक्रिया आता थांबवण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांना अजून काही काळ रस्त्यावर ये-जा करताना वाहतूक कोंडी सहन करावी लागणार आहे.

पहिल्या टप्प्यातील रस्ता सोलू, निरगुडे ते वडगाव शिंदे दरम्यान 4.7 किलोमीटर लांबीचा आहे. भूसंपादनासाठी पीएमआरडीएने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला होता, ज्यात वन आणि संरक्षण विभागाची जमीन वगळता बाकीची जागा मिळाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी 23 हेक्टर जागा लागणार असून, त्यातील वन विभागाची जमीन मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. संरक्षण विभागाची जमीन अजून ताब्यात न मिळाल्यामुळे निविदा काढण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली आहे.. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा रखडला आहे.

रिंग रोडचा उद्देश शहरातील वाहतुकीत सुधारणा आणणे आणि बाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांना शहरात प्रवेश टाळणे आहे. तसेच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील सतत वाढणारी वाहतूक कोंडी कमी करणे हा प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. हा रस्ता 1997 मध्ये पुणे जिल्हा प्रादेशिक योजनेत प्रस्तावित केला गेला, परंतु अनेक अडचणींमुळे तो अजून पूर्ण झाला नाही. पीएमआरडीए ने या रिंग रोडसाठी 145 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद केली आहे. रस्ता 65 मीटर रुंद असून, त्याची एकूण लांबी 128 किलोमीटर आहे. पहिला टप्पा सोलू ते वडगाव शिंदे दरम्यान असून, दुसरा टप्पा निरगुडे ते वडगाव शिंदे असा विभागलेला आहे. हा रस्ता मावळ तालुक्यातील परंदवडी ते खेड तालुक्यातील सोलू दरम्यान 40 किलोमीटर लांबीचा असून, त्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे.

हा रिंग रोड एकूण 44 गावांतून जाणार आहे.यात खेडमधील 1, हवेली 27, मुळशी 10 आणि मावळ तालुक्यातील 6 गावांचा समावेश होणार आहे.या प्रकल्पासाठी एकूण 743.41 हेक्टर जमीन लागणार आहे व 128 किलोमीटर लांबीतील रस्त्यात सुमारे 83 किलोमीटर काम PMRDA करणार आहे, 40 किलोमीटर MSRDC करणार आहे आणि 5.7 किलोमीटर काम महापालिकेने करणार आहे.
हा रिंग रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीत मोठा फरक पडणार आहे. बाहेरून येणारी अवजड वाहने शहरात न येता रिंग रोड वापरून मार्गक्रमण करतील, परिणामी शहरातील वाहतूक कोंडी आणि वेळेची बचत होणार आहे.
