“धोंड्यासाठी सोन्याची अंगठी हवीच!” पुण्यात हुंड्याच्या छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पती-सासूसह तिघांवर गुन्हा

पुणे : सण-उत्सवाच्या नावाखाली सुरू असलेला हुंड्याचा छळ आणि पैशांच्या सततच्या मागण्या एका 25 वर्षीय विवाहितेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली आहे. “धोंड्यासाठी सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून अपमान केला” आणि सातत्याने होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मृत महिलेचे नाव तेजस्विनी गोरख सोनवणे असे असून, 25 जून 2020 रोजी तिचा विवाह झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी नंतर सासरच्या मंडळींकडून पैशांची आणि वस्तूंची मागणी वाढू लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दाम्पत्याला अडीच वर्षांची मुलगी असूनही छळ थांबला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
तक्रारीनुसार, सासरकडून वेळोवेळी चारचाकी वाहन, फ्लॅट खरेदीसाठी 3 लाख रुपये आणि इतर आर्थिक मागण्या करण्यात येत होत्या. या मागण्या पूर्ण न झाल्यास तेजस्विनीला मानसिक त्रास, शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

एप्रिल 2026 मध्ये फ्लॅट खरेदीसाठी 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच अधिक मासानिमित्त आयोजित ‘धोंडा’ जेवणासाठी येण्यापूर्वी सोन्याची अंगठी द्यावी, अशी अट घालण्यात आल्याचा आरोप आहे. अंगठी न दिल्यास कार्यक्रमाला येणार नाही, अशी भूमिका सासरच्यांनी घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या सततच्या छळामुळे तेजस्विनी मानसिक तणावाखाली गेली होती. 2 जून 2026 रोजी रात्री तिच्या पतीने माहेरच्या नातेवाईकांना फोन करून ती खोलीचे दार उघडत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले.
घटनेनंतर चंदननगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध हुंडा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.