मोठी बातमी! निवडणुकाआधी हालचाली, ओबीसीमध्ये 29 जातींचा समावेश होणार? राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार..


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना राज्याच्या इतर मागासवर्ग (ओबीसी) जातींच्या महाराष्ट्राच्या यादीत नव्या २९ जातींचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आता राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील इतर मागासवर्ग समाजातील अनेक वर्गांकडून त्यांच्या जातीचा राज्याच्या ओबीसी जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव देण्यात येतात. त्यानुसार मागासवर्ग आयोगाकडून संबंधित जाती समूहांबाबतचे पुरावे; तसेच कागदपत्रांची छाननी केली जाते. कागदपत्रांची पडताळणी करून खातरजमा झाल्यानंतर संबंधित जातीचा राज्याच्या ओबीसी वर्गाच्या यादीत समावेश करण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडून ओबीसींमध्ये नव्याने २९ जातींचा समावेश करण्याची सरकारला शिफारस करण्यात आली आहे. ओबीसीच्या जातींची यादी तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत.राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला शिफारशींचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला आहे. राज्य सरकारची मोहोर उमटल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

कोणत्या जातींच्या समावेशाची शिफारस ?

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला २९ जातींचा ओबीसी वर्गाच्या जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी शिफारस केली आहे. त्यामध्ये लोध, लोधा, लोधी, बडगुजर, पेंढारी, वीरशैव लिंगायत, लिंगायत गुरव; तसेच लिंगायतमधील जंगम, न्हावी, तेली, माळी, धोबी, फुलारी, सुतारी आदी उपजातींच्या समावेशाची शिफारस केली आहे. पोवार, भोयर, पवार, गुजर, रेवा गुजर, सूर्यवंशी गुजर, बेलदार, सलमानी, किराड, डांगरी, कलवार, कुलवंत वाणी, वाणी (कुलवंत), कुमावत, नेवेवाणी, वरठी, परीट, धोबी, पटवा, सपलिग, सपलिगा, निषाद, मल्लाह, कुंजडा, दोरी, ईस्ट इंडियन, ईस्ट इंडियन ख्रिश्चन, शेगर, कानोडी, गवलान या जातींचा समावेश करण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आली आहे

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!