UPI युजर्ससाठी मोठी बातमी! प्रत्येक व्यवहारावर चार्ज लागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली : देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस व्यवहारांबाबत केंद्र सरकार महत्त्वाचा कायदेशीर बदल करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित बदलामुळे भविष्यात मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, सध्या UPI व्यवहारांवर ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारण्याचा निर्णय झालेला नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे.
कायद्यातील दुरुस्तीचा प्रस्ताव
डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने पेमेंट्स अँड सेटलमेंट सिस्टीम्स ॲक्ट, 2007 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासाठी टॅक्सेशन अँड अदर लॉज (अमेंडमेंट) बिल, 2026 संसदेत सादर करण्यात आले आहे.

या प्रस्तावित दुरुस्तीनुसार, कोणत्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना MDR मधून सूट द्यायची आणि कोणत्या व्यवहारांवर MDR लागू करायचा, याचा निर्णय अधिसूचनेद्वारे घेण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असेल.


UPI व्यवहारांवर पुन्हा MDR लागू होऊ शकतो?
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जानेवारी 2020 पासून UPI आणि RuPay डेबिट कार्ड व्यवहारांवरील MDR पूर्णपणे शून्य करण्यात आला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना UPI द्वारे पेमेंट स्वीकारताना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नव्हते.
मात्र, नव्या कायदेशीर तरतुदीनंतर भविष्यात गरज भासल्यास, विशेषतः मोठ्या व्यापाऱ्यांसाठी MDR पुन्हा लागू करण्याचा पर्याय सरकारकडे उपलब्ध राहू शकतो. त्यामुळे डिजिटल पेमेंट व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार सरकारला मिळणार आहेत.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजे ग्राहकांकडून डिजिटल पद्धतीने पैसे स्वीकारताना दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ऑनलाइन व्यापाऱ्यांनी बँका आणि पेमेंट सेवा पुरवठादारांना भरायचे शुल्क होय.
सध्या हे शुल्क क्रेडिट कार्ड आणि इतर काही डिजिटल पेमेंट पद्धतींवर लागू आहे. मात्र UPI आणि RuPay डेबिट कार्ड व्यवहारांवर जानेवारी 2020 पासून MDR शून्य आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या प्रस्तावामुळे तात्काळ UPI व्यवहारांवर शुल्क लागू होणार नाही. हा बदल केवळ सरकारला भविष्यात आवश्यक वाटल्यास MDR संदर्भात निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार देणारा आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांसाठी UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.