विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा, चंद्रकांत पाटलांची घोषणा…


पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आता पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा सीईटी परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यास मान्यता दिली असून यामुळे विद्यार्थ्यांना आता अधिक संधी उपलब्ध होणार आहे.

तसेच यापुढे पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर जसे JEE परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातात, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांना दोन प्रयत्नांची संधी मिळणार आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सीईटी परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असेल, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक राहील.

       

दरम्यान, जर एखाद्या विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षा दिल्या, तर त्या दोन्ही परीक्षांमधील जास्त गुणांची परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करण्याची आणि चांगल्या गुणांसह प्रवेश मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

आगामी शैक्षणिक वर्षासाठी पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तीन प्रमुख अभ्यासक्रमांच्या पहिल्या सीईटी परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये, तर दुसरी परीक्षा मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्य सीईटी कक्ष लवकरच जाहीर करणार आहे.

दरम्यान, या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!