रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ कुटुंबांना मिळू शकते कमी धान्य; केंद्राचा नवा प्रस्ताव चर्चेत..

मुंबई : देशातील रेशन वितरण व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा (दुरुस्ती) विधेयक, २०२६’चा मसुदा जाहीर केला असून, अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत धान्य वाटपाच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल सुचवण्यात आले आहेत. या प्रस्तावित बदलांमुळे लाखो रेशनकार्डधारक कुटुंबांवर परिणाम होऊ शकतो.

सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरमहा ३५ किलो धान्य दिले जाते. कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी असो किंवा जास्त, सर्वांना समान प्रमाणात धान्य मिळते. मात्र, नव्या मसुद्यानुसार ही पद्धत बदलून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा ७ किलो धान्य देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
या प्रस्तावामुळे कमी सदस्यसंख्या असलेल्या कुटुंबांच्या धान्य कोट्यात घट होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबात तीन सदस्य असतील तर त्यांना नव्या नियमानुसार दरमहा २१ किलो धान्य मिळेल. मात्र, सरकारने एका कुटुंबासाठी धान्याची कमाल मर्यादा ३५ किलोच ठेवण्याचा प्रस्तावही मांडला आहे. त्यामुळे कुटुंबात सदस्यसंख्या जास्त असली तरी ३५ किलोपेक्षा अधिक धान्य मिळणार नाही.

केंद्र सरकारच्या मते, या बदलामुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि संतुलित होण्यास मदत होईल. कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना आवश्यकतेपेक्षा जास्त धान्य मिळण्याची शक्यता कमी होईल, तसेच वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरवापरावर नियंत्रण ठेवता येईल.

दरम्यान, या मसुद्यावर केंद्र सरकारने नागरिक, तज्ज्ञ आणि विविध सामाजिक संघटनांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. इच्छुक नागरिक १३ जुलै २०२६ पर्यंत आपली मते सरकारकडे पाठवू शकतात. प्राप्त सूचना आणि हरकतींचा विचार करूनच विधेयकात अंतिम बदल केले जाणार असून त्यानंतर ते संसदेत मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे.