NEET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 2027 पासून परीक्षा पद्धतीत होऊ शकतात ‘हे’ मोठे बदल; जाणून घ्या काय बदलणार

मुंबई : वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. NEET UG 2027 परीक्षेच्या स्वरूपात मोठे बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) नव्या परीक्षा प्रणालीवर काम करत असल्याचे विविध अहवालांमध्ये सांगण्यात येत आहे.

मात्र, या बदलांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सध्या याकडे केवळ संभाव्य प्रस्ताव म्हणून पाहावे.
सध्या NEET UG परीक्षा देशभरात एकाच दिवशी आणि एकाच सत्रात पेन-पेपर व OMR शीटच्या माध्यमातून घेतली जाते. दरवर्षी सुमारे 22 ते 23 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात.

प्रस्तावित बदलांनुसार 2027 पासून परीक्षा पद्धतीत बदल करून परीक्षा सलग 5 ते 6 दिवस विविध शिफ्टमध्ये घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे परीक्षा केंद्रांवरील गर्दी कमी होऊन व्यवस्थापन अधिक सोपे होण्याची शक्यता आहे.

OMR ऐवजी Computer Based Test (CBT) प्रणाली लागू होण्याची शक्यता
या प्रस्तावातील सर्वात मोठा बदल म्हणजे पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणक आधारित परीक्षा (CBT) सुरू करण्याचा विचार आहे. डिजिटल पद्धतीमुळे प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवणे आणि पेपरफुटीचा धोका कमी करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय परीक्षा केंद्रांच्या संख्येतही बदल होण्याची शक्यता आहे. सध्या हजारो खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेतली जाते. भविष्यात परीक्षा केंद्रांची संख्या कमी करून केंद्रीय विद्यालय (KV) आणि जवाहर नवोदय विद्यालयांसारख्या सरकारी संस्थांमध्ये परीक्षा घेण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे.
वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिकेच्या अवघडपणातील फरक लक्षात घेण्यासाठी JEE Main प्रमाणे Normalization Process लागू करण्याचाही विचार केला जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे NEET UG च्या अभ्यासक्रमात कोणताही बदल प्रस्तावित नाही. Physics, Chemistry आणि Biology हे विषय पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत. मात्र, संगणकावर परीक्षा देण्याचा सराव विद्यार्थ्यांना करावा लागू शकतो.
दरम्यान, अधिकृत अधिसूचना जारी होईपर्यंत विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता सध्याच्या अभ्यासक्रमानुसार तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.