मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? 14 आमदारांनी एकनाथ शिंदेंसोबत केली गुप्त बैठक

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाला सलग मोठे धक्के बसत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाल्यानंतर आता पक्षातील आमदारांबाबतही मोठी माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील तब्बल 14 आमदारांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा आहे. या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, ‘ऑपरेशन टायगर 3’ पुन्हा सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी ठाकरे गटाचे सहा खासदार पक्षातून बाहेर पडले होते. त्यांनी स्वतंत्र गट स्थापनेसंदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्यानंतर शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

आता खासदारांनंतर आमदारांवरही शिंदे गटाचे लक्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, या हालचालींमागे ‘ऑपरेशन टायगर 3’ची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, याच कारणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडे एका महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर राहिल्याचाही दावा केला जात आहे.

मात्र, ठाकरे गटातील 14 आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याबाबत किंवा कोणतीही गुप्त बैठक झाल्याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या दाव्यांकडे सध्या राजकीय सूत्रांकडून समोर आलेली माहिती म्हणूनच पाहिले जात आहे.
जर आगामी काळात या चर्चांना प्रत्यक्षात पुष्टी मिळाली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.