मोठी बातमी! NEETनंतर आता TET पेपरफुटी; परीक्षा रद्द, राज्यभरात खळबळ


मुंबई : महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आता राज्यातील लाखो शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या विळख्यात सापडली आहे. ठाणे आणि भिवंडी परिसरात प्रश्नपत्रिका फुटल्याचे अधिकृतरीत्या उघड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जून रोजी होणारी TET परीक्षा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे ठाणे आणि भिवंडी परिसरात सुरू असलेल्या पेपरफुटी रॅकेटचा सुगावा लागला. त्यानंतर टाकलेल्या छाप्यात संशयितांकडून प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या. तपासात जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याची खात्री झाल्यानंतर पेपरफुटी सिद्ध झाली.

या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, काही खासगी कोचिंग क्लासेसचे चालक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. या संपूर्ण रॅकेटचा तपास पोलीस करत आहेत.

यंदा राज्यभरातील 1,028 परीक्षा केंद्रांवर TET परीक्षा होणार होती. यासाठी 2 लाख 26 हजारांहून अधिक डी.एड. आणि बी.एड. पात्र उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो उमेदवारांचा हिरमोड झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!