मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीतील 71 जणांचा ‘पत्ता’ कट, किती जण रिंगणात ?


पुणे : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी 20 हजार उमेदवार रिंगणात आहेत. अशातच आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी 71 जणांचा पत्ता कट झाला आहे.

पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीत 71 जणांचे मिळून एकूण 86 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 24 आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत उतरलेल्या 47 उमेदवारांचा समावेश आहे.

आज शुक्रवारपासून (दि.२३ जानेवारी) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत सुरू झाली आहे. यानुसार निवडणूक रिंगणातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या उमेदवारांना येत्या दि. २७ जानेवारीपर्यंत माघार घेता येणार आहे. मात्र येत्या रविवारी (दि.२५ जानेवारी) सार्वजनिक तर, सोमवारी (दि.२६ जानेवारी)प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने या दोन्ही दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेता येणार नाहीत.

जिल्हा परिषदेच्या 24 उमेदवारांचे 28 आणि पंचायत समित्यांच्या 47 उमेदवारांचे 58 उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले आहेत. या छाननीत अर्ज बाद झालेल्या झेडपीच्या उमेदवारांमध्ये 19 पुरुष व 5 महिला आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांमध्ये 24पुरूष आणि 23 महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वयक डॉ. चारूशीला देशमुख-मोहिते यांनी दिली. आहे.

पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 219 जागांसाठी 1806 जणांनी तब्बल2335 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी (दि.२२ जानेवारी) छाननी करण्यात आली. या छाननीत हे 86 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट व जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या 146 अशा एकूण 219 जागांसाठी ही निवडणूक होत असून, यासाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांमध्ये जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठीच्या 853 तर, जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या 146 जागांसाठीच्या 1482 अर्जांचा समावेश होता. यानुसार जिल्हा परिषद गटांसाठी 641 जणांनी 853तर पंचायत समित्यांच्या गणांसाठी 1165जणांनी 1482 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता जिल्हा परिषदेसाठी 621 उमेदवारांचे 825 व पंचायत समित्यांसाठीच्या 1122 जणांच्या 1424असे एकूण 2249 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघार घेण्यास आज पासून सुरुवात झाली असून ही मुदत येत्या 27 जानेवारी रोजी दुपारी तीनपर्यंत असणार आहे.

या निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर त्याच दिवशी दुपारी निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. शिवाय उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!