रेल्वेचा मोठा निर्णय! आता सकाळी मिडल बर्थ उघडी ठेवता येणार नाही; प्रवाशांमधील वाद थांबवण्यासाठी नवे नियम लागू

मुंबई : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि डब्यांमधील सतत होणारे वाद कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आरक्षित डब्यांमध्ये मधला बर्थ म्हणजेच मिडल बर्थ दिवसभर उघडा ठेवता येणार नाही. भारतीय रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, मिडल बर्थ फक्त रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंतच वापरता येईल. सकाळी ६ नंतर तो बंद ठेवणं बंधनकारक असणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनेकदा मिडल बर्थवरून प्रवाशांमध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे वारंवार येत होत्या. काही प्रवासी सकाळीही मिडल बर्थ खाली करत नसल्याने खालच्या बर्थवरील प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नव्हती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हे नियम अधिक कडकपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जोधपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हितेश यादव यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, रेल्वे बोर्डाने २०१७ मध्येच यासंदर्भात परिपत्रक जारी केलं होतं. मात्र आता या नियमांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली जाणार आहे. मिडल बर्थ सकाळी ६ नंतर बंद ठेवणं आवश्यक असेल आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाईही होऊ शकते.

रेल्वेने तिकीट तपासनीसांना म्हणजेच टीटीईंना विशेष अधिकार दिले आहेत. प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाल्यास टीटीई संबंधित नियम लागू करून परिस्थिती नियंत्रणात आणू शकतील. रेल्वे प्रशासनाच्या मते, या निर्णयामुळे प्रवास अधिक आरामदायी, शिस्तबद्ध आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, रेल्वेच्या या निर्णयाचं अनेक प्रवाशांकडून स्वागत केलं जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. प्रवासादरम्यान छोट्या कारणांवरून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेचे नियम जाणून घेणं आवश्यक असल्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.