पुणे पोलीस आयुक्तालयात मोठं लाचकांड! महिला अधिकारी 28 लाखांसह रंगेहात; दलात खळबळ

पुणे : पुणे शहर पोलीस दलात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालय परिसरात एका महिला पोलीस अधिकाऱ्याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

वैशाली तोटेवार असे या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. आयुक्तालयाच्या परिसरातच ही कारवाई झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, वैशाली तोटेवार यांची नुकतीच लोहमार्ग (रेल्वे) पोलीस, मुंबई येथे बदली झाली होती आणि त्यांना पुणे शहर पोलीस दलातून कार्यमुक्तही करण्यात आले होते. मात्र, बदलीनंतरही त्यांनी 28 लाखांची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेतील एका प्रकरणाच्या तपासादरम्यान एकूण 30 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 2 लाख रुपये आधीच स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित 28 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम एका खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारली जात असताना एसीबीने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ही लाच नेमकी कोणत्या प्रकरणासाठी घेतली जात होती, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध एसीबीकडून घेतला जात आहे.