2029 ला महायुती तुटणार? शिरसाटांच्या वक्तव्याने राजकारण तापलं


महाराष्ट्रच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. महायुतीतील सत्ताधारी पक्ष एकत्र राहणार की वेगळे मार्ग स्वीकारणार, याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे आणि याला कारण ठरले आहे संजय शिरसाट यांचे वक्तव्य.

“2029 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढू शकतात, कोणालाही थांबवलेले नाही,” असे स्पष्ट सांगत शिरसाट यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत मोठा इशारा दिला. पूर्वीही भाजप-शिवसेना युती तुटलेली आहे, त्यामुळे राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसते, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सध्या महायुती सरकार मजबूत असल्याचे सांगतानाच, प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यावर भर देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “आपला पक्ष मजबूत करणे हाच खरा मार्ग,” असे सांगत शिंदे गट संघटन वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचे संकेत त्यांनी दिले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न आहे, पण आम्ही स्वप्नात नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

पश्चिम महाराष्ट्रातील अंतर्गत वादांवर भाष्य करत शिरसाट म्हणाले की, पक्षातील मतभेद लवकरच मिटवले जातील आणि अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील.

या सगळ्या वक्तव्यांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे—महायुती सध्या एकत्र असली तरी भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीत काय चित्र असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!