अजित पवारांना मोठा धक्का ; पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपचं ‘कमळ’ घेणार हाती

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असताना जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा देखील झाली आहे. अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नगर परिषद निवडणुकीपूर्वी गारटकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पुढील काही दिवसांत प्रदीप गारटकर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ऑपरेशन लोटस राबवत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनामधील अनेकांना त्यांच्या पक्षात ओढले. निवडणुकीच्या तोंडावरच आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा प्रवेश आता निश्चित झाला असून पुढील काही दिवसांतच अधिकृत प्रवेशाची तारीख जाहीर होईल अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर प्रदीप गारटकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात फिरत असताना आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.प्रदीप गारटकर हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते.

मात्र इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवला होता. यामुळे अजित पवार गटात वाद उमटला. त्यानंतर आता ते अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.
