नाशिकमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक! मानवी कवटी, मासिक पाळीतील रक्त अन् साडेसात लाखांचा धक्कादायक प्रकार
नाशिक : आजार बरा करण्यासोबतच अघोरी विधी करून पैशांचा पाऊस पाडून देण्याचे आमिष दाखवत पनवेलमधील एका महिलेला तब्बल साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून कथित पूजाविधी केल्याचा आरोप आहे. मानवी कवटी आणि मासिक पाळीतील रक्ताचा वापर केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नाशिकमधील अरुण धोंडू पाटील या कथित भोंदूविरुद्ध १९ ऑक्टोबरच्या रात्री गंगापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दमा बरा करण्याचे आमिष, डोळ्यांवर पट्टी बांधून नाशिकला आणले
पनवेलमध्ये राहणारी संबंधित महिला दम्याच्या आजाराने त्रस्त होती. याच काळात तिला नाशिकमधील अरुण पाटील याच्या कथित दैवी शक्तींबाबत माहिती मिळाली. त्यानंतर संशयिताने महिलेला आणण्यासाठी पनवेलला वाहन पाठवले. महिलेला आणि तिच्या पतीला डोळ्यांवर पट्टी बांधून नाशिकला आणण्यात आल्याचा आरोप आहे. येथे कथित पूजाविधी केल्यानंतर पुन्हा त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना पनवेलला सोडण्यात आले. अशा प्रकारे दोन वेळा विधी करण्यात आले.


मासिक पाळीतील रक्ताचे कपडे आणण्यास सांगितले?
तक्रारीनुसार, पैशांचा पाऊस पाडून देण्याच्या नावाखाली महिलेला मासिक पाळीतील रक्ताने माखलेले कपडे आणण्यास सांगण्यात आले. तसेच तिला डोळ्यांवर पट्टी बांधून गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळ नेण्यात आले. तेथे पांढरे, पारदर्शक आणि पातळ वस्त्र नेसवून तिला कथित अघोरी विधीसाठी बसवण्यात आल्याचा आरोप आहे. या विधींमध्ये मानवी कवटीचाही वापर करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
साडेसात लाख रुपये दिले, पण ना आजार बरा झाला ना पैशांचा पाऊस
सुरुवातीच्या विधीनंतर आजारात सुधारणा झाल्याचा भास निर्माण झाल्याने महिलेचा संशयितावर विश्वास बसला. त्यानंतर तीन पूजाविधींसाठी मिळून साडेसात लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, महिलेचा आजार बरा झाला नाही आणि पैशांचा पाऊसही पडला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पैसे परत मागितले; परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
अंनिसच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांत गुन्हा
यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली. राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्यासह प्रल्हाद मिस्तरी, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, कोमल वर्दे आणि डॉ. मंगेश कादे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपांची पुढील चौकशी महत्त्वाची ठरणार असून, अंधश्रद्धेचा आधार घेऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
