मुंबईत मोठी कारवाई! हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींची सुटका, मेकअप आर्टिस्ट अटकेत..

मुंबई : सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छाप्यादरम्यान दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. याशिवाय एका संशयित दलालाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असून, दुसरीने बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये लहान भूमिका साकारल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तपासाच्या हितासाठी दोघींची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. त्याचे मनोरंजन क्षेत्रातील काही व्यक्तींशी संबंध असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो कथितपणे दलाल म्हणून काम करत होता आणि या रॅकेटमध्ये त्याची भूमिका असल्याचा संशय आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, पैशांची देवाणघेवाण तसेच इतर संबंधित व्यक्तींची भूमिका याचा तपास सुरू आहे. संबंधित हॉटेल व्यवस्थापन किंवा कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती होती का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले असून, तपासातून पुढील काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या या प्रकरणात इतर कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, अधिकृत तपास सुरू आहे.