काळजी घ्या! महाराष्ट्रात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव, ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. धुळे जिल्ह्यातील हिरे हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार सुरू असून दोन्ही नमुने पॉझिटिव्ह आल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे.

तसेच धुळे जिल्ह्यात सापडलेला हा रुग्ण गेल्या काही दिवसांपासून त्वचेवर पुरळ आणि तापाच्या तक्रारीने त्रस्त होता. तपासणीत त्याला मंकी पॉक्स व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासन उच्च सतर्कतेवर आहे.

नागरिकांना अनावश्यक घाबरू नका, पण काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.या रुग्णाने अलीकडेच सौदी अरेबियाहून भारतात परत येत धुळे येथे वास्तव्य सुरू केले होते. तो २ऑक्टोबर रोजी धुळ्यात परतला असून ३ ऑक्टोबर रोजी त्याने हिरे हॉस्पिटलमध्ये तपासणी केली होती.

त्वचेवर पुरळ आणि ताप असल्याने डॉक्टरांनी मंकी पॉक्सची शक्यता व्यक्त केली होती. पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था येथे पाठवलेल्या दोनही नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा हा पहिला रुग्ण म्हणून नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्याला स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेतला जात आहे.
धुळे महापालिका आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून या संसर्गाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. रुग्णाला डायबेटीज असल्याने त्याच्या उपचारांमध्ये वेळ लागत आहे. मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाने राज्यातील सर्व नागरिकांना स्वच्छता राखणे, मास्कचा वापर करणे आणि त्वचेवरील कोणत्याही संशयास्पद पुरळ आढळल्यास त्वरित तपासणी करण्याचं आवाहन केलं आहे. मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असला तरी योग्य उपचार आणि विलगीकरणाद्वारे त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
