बारामतीत खळबळ! ‘मी पुढारी आहे’ म्हणत नगरसेवकावर विधवा महिलेचा छळ–विनयभंग व खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल

बारामती : बारामती शहरात खळबळ उडवणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःला ‘पुढारी’ म्हणवणाऱ्या नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि खंडणीसाठी दबाव टाकल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. पीडित महिला ही विधवा असून तिच्या पतीच्या निधनानंतर ती एकटी राहत होती. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आरोपी किशोर मासाळ याने तिच्या ओळखीचा फायदा घेत वारंवार तिच्या घरात अनधिकृत प्रवेश केला, असा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ केल्याचे नमूद आहे. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला धमकावत “मी पुढारी आहे, तुम्हाला इथे सुखाने जगू देणार नाही. माझ्या खूप ओळखी आहेत, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

याशिवाय, आरोपीने पीडित महिलेचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये असल्याचे सांगत त्याचा गैरवापर करून तिला सतत दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने महिलेचा वारंवार पाठलाग करून तिला मारहाणही केली.

प्रकरण अधिक गंभीर करत आरोपीने उद्योजकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा दबावही पीडितेवर टाकल्याचे समोर आले आहे. “तू बारामतीतील उद्योजकांना ब्लॅकमेल करून माझ्यासाठी पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिच्या तक्रारीनुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे बारामती शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे.