“काय बंधू…’ची हाक आजही कानात घुमते; अजितदादांच्या जयंतीदिनी राजेंद्र पवारांच्या भावनिक आठवणींनी बारामती हेलावली”


बारामती : २२ जुलै हा दिवस एकेकाळी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असे. कार्यकर्त्यांची गर्दी, शुभेच्छांचा वर्षाव आणि विविध सामाजिक उपक्रमांनी हा दिवस गजबजलेला असायचा. मात्र त्यांच्या निधनानंतर यंदा प्रथमच हा दिवस जयंती म्हणून साजरा होत असून, राज्यभरातील समर्थक आणि बारामतीकरांसाठी तो भावनांनी भरलेला ठरला आहे. या निमित्ताने एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत अजित पवारांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले.

राजेंद्र पवार यांनी बालपणापासूनच्या आठवणी सांगताना लिहिले की, लहानपणी दोघेही बारामतीत कंदील घेऊन रात्री फिरत असत, उन्हाळ्यात फाट्यात पोहायला जात आणि अनेक खोड्या करत दिवस घालवत. शाळेचे प्रमाणपत्र आणण्याची भीती वाटल्याने दोघेही घरी न जाता मुंबईच्या चौपाटीवर शाळा सुरू होईपर्यंत थांबले होते. त्याच काळात लाल दिव्याच्या गाड्या पाहून “आपण कधी असे होणार?” असा प्रश्न पडायचा आणि पुढे अजित पवार राज्याचे मंत्री झाले, अशी आठवण त्यांनी सांगितली.

कुटुंबातील अनेक प्रसंगांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. तात्यासाहेबांच्या अस्थींचे विसर्जन, बंगळुरूहून ट्रकमधून गायी आणण्याचा प्रवास, पतंग उडवण्याच्या स्पर्धा, रोहित पवार दोन महिन्यांचे असताना संपूर्ण कुटुंबासह ऊटीला केलेला प्रवास आणि पुढे रोहितच्या पहिल्या निवडणुकीत अजित पवारांनी घेतलेली जबाबदारी अशा अनेक आठवणी त्यांनी शेअर केल्या.

राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी नात्यातील जिव्हाळा कायम राहिला, असेही त्यांनी नमूद केले. शेवटच्या काळात पुन्हा एकत्र काम करण्याबाबत अजित पवार सकारात्मक बोलत असत, असे त्यांनी सांगितले. कृषिकच्या उद्घाटनावेळी त्यांनी आवर्जून वहिनींच्या हातचे आवडते जेवण केले आणि मनापासून कौतुक केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

पोस्टच्या शेवटी राजेंद्र पवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “तू नसल्याचं वास्तव स्वीकारलं आहे, पण आजही तू अचानक समोर येशील, अशी मनाची समजूत होते. ‘काय बंधू…’ अशी तुझी हाक पुन्हा एकदा ऐकायला मिळावी, अशीच मनाची कायम प्रतीक्षा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, अजित पवारांच्या जयंतीनिमित्त बारामतीसह राज्यातील विविध भागांत त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. मात्र यंदाचा २२ जुलै हा जल्लोषाचा नव्हे, तर आठवणी, भावनिक क्षण आणि एका लोकप्रिय नेत्याच्या अनुपस्थितीची तीव्र जाणीव करून देणारा दिवस ठरला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!