‘प्रिन्सिका’सोबत स्नॅपचॅटवर 7 महिने मैत्री; पुण्याच्या तरुणाला वाटलं ती मुलगी, पण सत्य समजताच बसला धक्का


पुणे : सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवणं पुण्यातील एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. तब्बल सात महिने स्नॅपचॅटवर सुरू असलेल्या संवादातून आरोपीने तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असं आमिष दाखवून त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये उकळण्यात आले.

फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणाने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. तपास सुरू झाल्यानंतर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाच्या प्रोफाईलमागे तरुणी नसून एक २५ वर्षीय तरुण असल्याचं समोर आलं.

स्नॅपचॅटवरून झाली मैत्री

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणाला स्नॅपचॅटवर ‘प्रिन्सिका जोशी’ नावाच्या अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. आरोपीने तरुणीच्या नावाने आणि आवाजात सातत्याने संवाद साधत हळूहळू त्याचा विश्वास संपादन केला.

काही काळाने आरोपीने क्रिप्टोकरन्सीमध्ये म्हणजेच USDT मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, असं सांगितलं. या आमिषाला बळी पडून तरुणाने आपल्या क्रिप्टो वॉलेटमधून १,४६८ USDT म्हणजेच सुमारे १.५ लाख रुपये समोरच्या वॉलेटवर ट्रान्सफर केले.

पैसे मिळताच संवाद बंद

पैसे ट्रान्सफर केल्यानंतर समोरून प्रतिसाद मिळणं बंद झालं. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद न मिळाल्याने तरुणाला आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी स्नॅपचॅट आयडी, मोबाईल क्रमांक आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तांत्रिक तपासातून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले.

‘प्रिन्सिका’च्या नावामागे कोण?

तपासादरम्यान ‘प्रिन्सिका जोशी’ नावाच्या प्रोफाईलमागे कुणाल जितेंद्र अदमाने (वय २५, रा. पर्वती परिसर) असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी त्याला अटक केली.

सात महिने तरुणीच्या नावाने आणि आवाजात संवाद साधून विश्वास संपादन केल्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप कुणालवर आहे.

ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!