शिंदेंचं भाषण सुरू अन् स्टेजवर समईचा भडका! सरनाईक धावले अन्.. ठाण्यात नेमकं काय घडलं?

ठाणे : ठाण्यातील एका विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत असताना व्यासपीठावर अचानक समईने पेट घेतल्याने काही क्षणांसाठी खळबळ उडाली. समईमधून मोठ्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे लक्षात येताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत आग विझवली. विशेष म्हणजे, जवळ उपलब्ध असलेल्या फुलांचा वापर करत त्यांनी पेटलेल्या समईवर फुले टाकली आणि काही क्षणांत आग नियंत्रणात आणली.
ठाण्यात परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करण्यास सुरुवात केली.

शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठाच्या एका बाजूला ठेवलेल्या समईने अचानक मोठ्या प्रमाणात पेट घेतला. सुरुवातीला लक्षात येताच ज्वाळा वाढत गेल्याने मंचावर काही क्षणांसाठी परिस्थिती चिंताजनक बनली. मात्र याच वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नजरेस ही बाब पडली.


सरनाईक यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ समईजवळ धाव घेतली. आजूबाजूला उपलब्ध असलेल्या हारातील फुले त्यांनी हातात घेतली आणि ती थेट पेटलेल्या समईवर टाकली. फुले टाकल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे आग व्यासपीठावरील इतर वस्तूंपर्यंत पसरण्याचा संभाव्य धोका टळला.
या संपूर्ण प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांचे काही क्षणांसाठी लक्ष शिंदेंच्या भाषणाऐवजी पेटलेल्या समईकडे गेले. मात्र सरनाईकांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच नियंत्रणात आली. या घटनेत कोणाला दुखापत झाल्याची किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, समईला नेमकी कशामुळे आग लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम झाल्यानंतर काही वेळाने हा प्रकार घडल्याने नेमके कारण काय होते, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे मंचावर भाषण करत असताना समईला आग लागल्याचे आणि प्रताप सरनाईक यांनी तत्परतेने पुढे येत फुले टाकून ती विझवल्याचे दिसून येत आहे. सरनाईकांच्या या प्रसंगावधानामुळे मंचावर संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा सुरू आहे.