बारामती कनेक्शनमुळे खेडकर कुटुंब अडचणीत? १३.३० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दिलीप खेडकरांसह पत्नीवर गुन्हा; १० ठिकाणी एसीबीची धाड


पुणे : माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील आणि सेवानिवृत्त शासकीय अधिकारी दिलीप खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ज्ञात उत्पन्नापेक्षा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त मालमत्ता आणि खर्च आढळल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या तपासानुसार, खेडकर दाम्पत्याकडे १३ कोटी ३० लाख रुपयांपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पहाटेच १० ठिकाणी एसीबीची धडक

या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून एसीबीच्या नाशिक आणि अहिल्यानगर युनिटने संयुक्तपणे मोठी शोधमोहीम राबवली. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील खेडकर यांच्या मूळ निवासस्थानासह तब्बल १० ठिकाणी एकाच वेळी झडती घेण्यात आली. मंगळवारी पहाटे सुरू झालेल्या या कारवाईत ३० हून अधिक तपास अधिकारी सहभागी झाले होते.

झडतीदरम्यान मालमत्ता, आर्थिक व्यवहार, बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे तसेच इतर महत्त्वाच्या नोंदी तपासण्यात आल्या. काही कागदपत्रे तपास पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

१९९५ ते २०२३ या कालावधीतील व्यवहारांची छाननी

एसीबीने दिलीप खेडकर यांच्या सेवाकालातील १९९५ ते २०२३ या कालावधीतील उत्पन्न, मालमत्ता आणि खर्चाची सखोल तपासणी केली. वेतनातून मिळालेले उत्पन्न, बँक कर्ज, विमा आणि निवृत्तीनंतर मिळालेल्या विविध रकमा यासह अनेक आर्थिक स्रोत तपासण्यात आले.

त्याचवेळी वाहन खरेदी-विक्री, वाहन देखभाल व इंधन, शिक्षण, विमा, बांधकाम, फर्निचर, बँक व्यवहार आणि इतर खर्चांचीदेखील छाननी करण्यात आली. तपासात १२७ आर्थिक नोंदींचा अभ्यास करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पुणे, बारामती, मुंबईसह अनेक ठिकाणी मालमत्ता

एसीबीच्या तपासात खेडकर कुटुंबीयांच्या मालमत्तेचे धागे अनेक शहरांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर, भालगाव, पुणे शहर, हवेली, औंध, मुळशी, बारामती, मुंबईतील पवई आणि पनवेल, खरवंडी कासार तसेच शिरूर कासार या परिसरांमध्ये मालमत्ता असल्याचे कागदपत्रांमधून आढळल्याची माहिती आहे.

यामुळे या प्रकरणातील तपासाचा आवाका केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित राहिलेला नसून विविध शहरांतील मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांचीही पडताळणी केली जात आहे.

२०१२ मध्ये तक्रार, २०१४ पासून प्राथमिक चौकशी

खेडकर यांच्या कथित बेहिशोबी संपत्तीबाबत पंढरीनाथ साबळे यांनी २०१२ मध्ये एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २०१४ पासून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. अनेक वर्षांच्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर आता या प्रकरणात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीच्या तपासानुसार ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत सुमारे १०२ टक्के अतिरिक्त मालमत्ता आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्याविरोधातील प्रकरणाला आता कायदेशीर तपासाचा पुढील टप्पा सुरू झाला आहे.

दरम्यान, एसीबीच्या या कारवाईत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. झडतीमध्ये मिळालेली कागदपत्रे, मालमत्तेशी संबंधित व्यवहार आणि आर्थिक नोंदी यांची पुढील तपासणी केली जाणार असून, तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!