भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, सुट्टीचा आनंद घेताना घडली धक्कादायक घटना..

पुणे : भोर तालुक्यातील जयतपाड येथे असणाऱ्या भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. १५ ऑगस्टनिमित्त पर्यटनासाठी आलेले वडील-मुलगी भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये उतरले होते.
मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुडालेल्या दोघांचेही मृतदेह मिळाले आहेत. मुलीचा मृतदेह रात्री सापडला तर वडिलांचा मृतदेह सकाळी आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) आणि ऐश्वर्या मनोहर धर्माधिकारी (वय १३) असे बुडून मृत्यू झालेल्या बाप लेकीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, धर्माधिकारी कुटुंब हे मित्र परिवारासह १५ ऑगस्टच्या निमित्ताने फिरण्यासाठी भोर तालुक्यातील जयतपाड येथे आले होते. हे सर्वजण दुपारी ४ वाजताच्या सुमारास सिमा फार्म पाठीमागे भाटघर धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी गेले होते. यावेळी शिरीष हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले.
ते खोल पाण्यात उतरले, त्यानंतर त्यांची मुलगी ऐश्वर्या हिला देखील त्यांनी तिथे बोलावून घेतले. दोघेही पाच ते सहा मिनिटं खोल पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. त्यावेळी आरडाओरडा झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या दोघांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरु केले.
यावेळी नागरिकांनी ऐश्वर्याला बाहेर काढले. त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यानंतर तिला भोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आज सकाळी शिरीष धर्माधिकारी यांचाही मृतदेह मिळाला असून शवविच्छेदनासाठी तो पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, भोर पोलिसांकडून अधिक तपास करण्याचे काम सुरू आहे. पर्यटनासाठी आल्यानंतर नको ते धाडस करणे धर्माधिकारी यांना चांगलेच महागात पडले आहे.