संतोष देशमुख हत्या प्रकरणी बडा मासा अटकेत, पोलिसांनी डॉक्टरला घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?

बीड : जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटेनचा सर्व स्तरावरुन निषेध केला जात आहे.
तसेच ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. पण मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तीन जण फरार होते. त्यातल्या दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच या आरोपींना कशी आणि कुठून अटक झाली? त्या बद्दल माहिती मिळेल.
या प्रकरणातील दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे. पण कृष्णा आंधळे अजून फरार आहे. दरम्यान या दोन मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या आणि टीप देणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचवेळी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे यांना अटक करण्यात आली आहे.
सुदर्शन घुले आणि इतर आरोपीना पळवून लावण्यात संभाजी वायबसेची महत्वाची भूमिका होती. डॉ संभाजी वायबसे यानेच पळून जाण्यात मदत केल्याच समोर आलं आहे.
वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली. ३ आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते. दोन्ही आरोपींना बसवराज तेली यांच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आले आहे.