रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! पुणे स्थानकावर 9 तासांचा मेगा ब्लॉक; ‘या’ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळापत्रकात मोठे बदल

पुणे : मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे रेल्वे यार्डातील डीडीएस पॉईंट्सच्या श्रेणी सुधारणा कामासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 5 जुलै रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत तब्बल 9 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉकदरम्यान पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून मुंबईच्या दिशेने रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्यातून सुटणाऱ्या आणि पुण्याकडे येणाऱ्या अनेक गाड्यांवर परिणाम होणार असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच रेल्वे स्थानकावर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या गाड्या पूर्णपणे रद्द
पुणे – तळेगाव
तळेगाव – पुणे
पुणे – दौंड डेमू
सातारा – पुणे डेमू
मुंबई CSMT – पुणे एक्स्प्रेस
पुणे – मुंबई CSMT एक्स्प्रेस
या गाड्या अंशतः रद्द

ब्लॉकच्या कालावधीत लोणावळा–पुणे आणि तळेगाव–पुणे लोकल या शिवाजीनगरपर्यंतच धावतील. तसेच बारामती–पुणे डेमू दौंड स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल.

या गाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल
जयपूर–पुणे, जम्मू तावी–पुणे, अमरावती–पुणे आणि नागपूर–पुणे एक्स्प्रेससह काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे तात्पुरते बदलण्यात आले आहेत. काही गाड्या खडकी, हडपसर किंवा सातारा स्थानकावरून पुढील प्रवास सुरू करतील. याशिवाय काही एक्स्प्रेस गाड्या सुमारे 30 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आणि आवश्यक असल्यास पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.