पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतुकीत बदल, वाहनधारकांनो बाहेर पडण्यापूर्वी बदल जाणून घ्या..

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने तात्पुरते बदल केले आहेत. विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतुकीसाठी नवीन मार्ग आखण्यात आले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
खराडी परिसरातील वाहतूक बदल..
खराडी बायपासमार्गे खराडी दर्गा चौकातून उजवीकडे वळण घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग – वाहनचालकांनी खराडी बायपास चौकातून पुढे जाऊन ‘आपले घर’ बसस्थानकाजवळ यू-टर्न घ्यावा आणि नंतर खराडी दर्गा चौकामार्गे पुढे जावे.
विमानतळ परिसरातील वाहतूक बदल..
सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी न्यू एअरपोर्ट रस्त्यावरून रामवाडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग – वाहनचालकांनी दोराबजी मॉल चौकातून यू-टर्न घेऊन किंवा एअरपोर्ट चौकातून पेट्रोल साठा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे.
बाणेर परिसरातील वाहतूक बदल..
बाणेर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महाबळेश्वर हॉटेल चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पाषाण रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
पर्यायी मार्ग – बाणेर पाषाण लिंक रस्त्यावरून विद्यापीठाकडे जाणारे वाहनचालक ४५ आयकॉन आयटी कंपनीसमोरून यू-टर्न घेऊन महाबळेश्वर हॉटेल चौकातून विद्यापीठमार्गे पुढे जाऊ शकतात. बाणेर गावातून बाणेर पाषाण लिंक रोडकडे जाण्यासाठी माऊली पेट्रोल पंपाजवळ यू-टर्न घेऊन महाबळेश्वर हॉटेल चौकामार्गे पुढे जाता येईल.
वाहतूक विभागाने वाहनचालकांना विनंती केली आहे की, नवीन नियम पाळावेत आणि सुरक्षित प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा.