पुणेकरांनो लक्ष द्या! पालखी सोहळ्यामुळे आजपासून वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांवर वाहनांना बंदी


पुणे : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज (९ जुलै) पुणे शहरात भव्य आगमन होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पुण्यात दाखल होणार आहेत.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ९ ते ११ जुलैदरम्यान विशेष वाहतूक नियोजन लागू केले आहे. पालखी मार्गावरील आणि मुक्कामस्थळांच्या परिसरातील अनेक रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शहरात जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

आज पहाटेपासून ‘या’ मार्गांवर वाहतूक बंद

पालखी आगमनाच्या दिवशी ९ जुलै रोजी पहाटेपासून रात्रीपर्यंत काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. यामध्ये—

बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी, आळंदी रस्ता
पाटील इस्टेट, वाकडेवाडी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर
गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता
गणेशखिंड रस्ता, बेलबाग चौक, बुधवार चौक
नाना पेठ आणि भवानी पेठ परिसर

या मार्गांचा समावेश आहे.

पालखी मुक्काम परिसरात वाहनांना प्रवेश नाही

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे.

या परिसरात ९ जुलैच्या दुपारपासून ११ जुलैपर्यंत सर्वसामान्य वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता यांसह इतर प्रमुख मार्गांवर वाहतुकीचे कडक निर्बंध लागू राहतील.

जड वाहनांना शहरात नो-एंट्री

पालखी सोहळ्याच्या काळात पुणे शहरात सर्व दिशांनी येणाऱ्या अवजड आणि जड वाहनांना ९ ते ११ जुलैपर्यंत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे.

भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था

बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पोलिसांनी विविध भागांमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे. पालखी मुक्काम परिसरात वाहनांना परवानगी नसल्याने नागरिकांनी कात्रज, वारजे, सिंहगड रस्ता, कोथरूड, शिवाजीनगर, खडकी, गोखलेनगर, येरवडा, हडपसर आणि वानवडी परिसरातील पार्किंग ठिकाणांचा वापर करावा.

पालखी सोहळ्याच्या काळात पुणेकरांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!